माझ्या वडिलांची मिराशी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ।।
ह.भ.प. वेदविभूषण श्री उद्बोधमहाराज पैठणकर यांचा अल्पपरिचय
श्रीगुरुवर्य श्रीमोहननाथ महाराजांचे सुपुत्र.
वयाच्या सातव्या वर्षी व्रतबंध संस्कार झाल्यावर अल्पकालावधीतच १० जून २००१ साली वेद पाठशाळेत प्रवेश घेऊन श्रीसंत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शुक्ल यजुर्वेद संहिता पूर्ण करून महर्षि सांदिपनी राष्ट्रीय वेद विद्यालय, उजैन येथून वेदविभूषण पदवी प्राप्त. वैदिक शिक्षणानंतर श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभा, नारद मंदिर, पुणे येथे नारदीय कीर्तन परंपरेचे अध्ययन केले व वै. स्वानंदसुखनिवासी सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था, आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे, संत वाङमयाचे व कीर्तनोपयोगी संगीताचे अध्ययन पूर्ण करून आज पावेतो महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्रवचन, कीर्तन व व्याख्यानांच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्म संस्कृतिचा, वारकरी संप्रदायाचा व नाथपरंपरेचा प्रचार प्रसार करण्याचे व संत विचार जनमानसात रूजविण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे. वैदिक, वारकरी व नारदीय कीर्तनपरंपरा या क्षेत्रामध्ये युवाकीर्तनकार व इतर अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.
विद्यालय व श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय हे वैदिक व वारकरी संयुक्त विद्यालय व्हावे, ही प्रेरणा प.पू.गुरुवर्य मोहननाथ महाराज यांची आहे आणि तिला मूर्त स्वरूपात साकार करण्याची संकल्पना श्री. उद्बोधमहाराज यांची आहे. स्वतः वैदिक व वारकरी यांचे गुरुकुल पध्दतीने, शास्त्रोक्त पध्दतीने अध्ययन केलेले असल्यामुळे त्यांच्या ठायी या दोहींचा उत्तम समन्वय आपल्याला दिसून येतो.