nath-itihas-banner-img

इतिहास

आदिनाथ समारम्भां ज्ञानदेवसुमध्यमाम् ।
अस्मद् आचार्य पर्यन्तां वन्दे गुरु परम्पराम् ।।

nath-about-bottom-img

पूर्व इतिहास

भगवान श्रीआदीनाथांपासून प्रवाहीत झालेली ही नाथ परंपरा अनुक्रमे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज व संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्यापर्यंत प्रवाहीत झाली. अखंड भारतात या नाथ परंपरेचे कार्य व विस्तार झाला. महाराष्ट्रात विशेषत्वाने नाथ परंपरेचे महत्त्व आहे, त्याचे कारण म्हणजे विश्वाची माऊली असलेल्या संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांना याच नाथ परंपरेचा अनुग्रह झाला व गुरुपरंपरा लाभली. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची संस्थापना केली व सामान्य भाविकांना परमात्म प्राप्तीचा एक राजमार्ग निर्माण करून दिला. या बरोबरच पूर्वापार चालत आलेली आपली नाथ परंपरा खंडीत न होऊ देता गुरूपरंपरेने लाभलेल्या अद्वयानंद वैभवाला भक्तीप्रेम मुद्रेची जोड दिली व ही नाथपरंपरा पुढे श्री सत्यामलनाथांच्या रूपाने प्रवाहीत केली.


ज्ञानराज बोध केला ।
सत्यामला रेडा बोलविला। प्रतिष्ठाणी ।।


असे श्रीएकनाथ महाराजांनी वर्णन केलेले आहे. पुढे सत्यामलनाथ, गैबीनाथ, गुप्तनाथ, उदबोधनाथ, केसरीनाथ, शिवादीननाथ व श्रीसंत नरहरीनाथ महाराज यांच्यापर्यंत हि परंपरा चालत आली. श्रीसंत नरहरीनाथ महाराज हे श्रीसंत शिवादीननाथ महाराज यांचे शिष्य व चिरंजीव.


श्रीसंत नरहरिनाथमहाराज यांचा जन्म व अध्ययन हे पैठण येथे झाले व पुढे राजमाता श्रीजिजाबाई यांचे बंधूं पैकी श्रीजगदेवरावराजे जाधव यांनी श्रीनरहरीनाथ महाराजांना श्रीबालाजी महाराज मूर्ति मिळाल्यावर राजगुरू म्हणून श्रीक्षेत्र देऊळगांव राजास बोलावले. श्रीसंत नरहरिनाथ महाराजांनी आपल्या संत लक्ष्मीनाथ, संत महिपतीनाथ व संत नारायणनाथ महाराज या शिष्यांसह महाराष्ट्रसह अनेक राज्यात नाथपरंपरेच्या प्रचार व प्रसाराचे मोठे कार्य केले व माघ वद्य दशमी, शके १७१५ साली श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे समाधी घेतली.


संत लक्ष्मीनाथ महाराज यांना आपल्या गुरुभक्तीच्या कृपाप्रसादाने श्रीक्षेत्र आळंदी येथे श्रीमाऊलींच्या समाधी सान्निध्यात समाधी घेण्याचे महाद्भाग्य लाभले. श्रीक्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या मंदिरात संत भोजलिंग काका यांच्या समाधी शेजारी संत लक्ष्मीनाथ महाराज यांची समाधी आहे. श्रीसंत नारायणनाथ महाराज यांची समाधी श्रीक्षेत्र न्हावी, तालुका यावल, जिल्हा जळगांव येथे व संत महिपतीनाथ महाराज यांची समाधी ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे आहे. ग्वाल्हेर व न्हावी येथील दोन्ही संस्थान येथे आजही गुरु परंपरेचा मान श्रीक्षेत्र देऊळगांवराजा
येथील पिठाधीश यांना आहे.


गेल्या सव्वादोनशेहून अधिक वर्षे या नाथ परंपरेचे प्रबोधनाचे व सेवेचे हे कार्य श्रीसंत विट्ठलनाथ महाराज, श्रीसंत गणेशनाथ महाराज, श्रीसंत गौतमनाथमहाराज व विद्यमान पीठाधीश श्रद्धेय परमपूज्य मोहननाथ महाराज यांचे तीर्थरुप श्रीसंत भानुदासनाथ महाराजांच्या रूपाने अखंड अविरत सुरू राहिले व आज परमपूज्य श्रीगुरुवर्य मोहननाथ महाराजांच्या शुभाशीर्वादाने, पावन सहवासाने या परंपरेच्या सेवा व विस्तारकार्याची मोठी नांदी होत आहे.

nath-divider-icon-img