nath-sansthan-banner-img

संस्थान

देऊळग्रामी वास तुझा भक्त करिती अर्चन ।
जन्मभूमी प्रतिष्ठाण तेथे गुप्त अनुसंधान ।।

nath-about-bottom-img

उत्सव

श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान येथे वार्षिक चाळीस उत्सव संपन्न होतात, ज्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून सर्व मुख्य देवावतार जन्मोत्सव, संतांचे पुण्यतिथी उत्सव, आषाढी व कार्तिकी एकादशी, गुरूपौर्णिमा, इत्यादी उत्सवांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त न्हावी, बीड, ग्वाल्हेर, खामगाव व इतर परंपरेच्या गावी प्रतिवर्षी नाथसंप्रदायी भिक्षेचा दौरा असतो.


संस्थानचा मुख्य उत्सव म्हणजे महाशिवरात्र, अर्थातश्रीसंत नरहरिनाथ महाराज व सद्गुरु श्रीसंत शिवदिननाथ महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव. श्रीसंत नरहरिनाथ महाराज यांची पुण्यतिथी माघ वद्य दशमी व सद्गुरू श्रीसंत शिवदिननाथ महाराज यांची पुण्यतिथी माघ वद्य त्रयोदशी, अर्थात महाशिवरात्र या दिवशी असते. या संतद्वयांचा पुण्यतिथी उत्सव व महाशिवरात्रीचा पर्वकाळ असा त्रिवेणी संगम या कालावधीत साध्य होत असल्यामुळे प्रतिवर्षी हा महोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.


माघ वद्य अष्टमी ते माघ वद्य अमावस्या असा आठ दिवसांचा हा उत्सव असतो. माघ वद्य अष्टमीला पूज्यश्री महाराजांच्या शुभहस्ते ग्रामदैवत श्रीबालाजी महाराज व इतर देवतांना अक्षत देऊन मंडप पूजन, गणपती पूजन, ध्वजारोहण होऊन मठातील श्रीअन्नपूर्णा देवीची अन्नपूर्णालयात स्थापना होते व ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पूजन होऊन पारायणास प्रारंभ होतो.या कालावधीत दररोज महाराष्ट्रातील विविध वक्त्यांचे कीर्तन, प्रवचन आयोजित करण्यात येतात. दररोज हजारो भाविकांना अन्नदान महाप्रसाद प्राप्त होतो.


माघ वद्य दशमीच्या दिवशी श्रीसंत नरहरिनाथ महाराज समाधीस महारुद्राभिषेक होऊन पोशाख करण्यात येतो. महाआरती, महाप्रसाद झाल्यावर रात्रौ संत माहिपतीनाथ महाराज, ढोलीबुवा संस्थान, ग्वाहलेर यांचे वतीने मुख्य पुण्यतिथीचे कीर्तन संपन्न होते.


माघ वद्य त्रयोदशी, अर्थात महाशिवरात्रीचे दिवशी प्रातःकाळी गुरुमंत्र दीक्षेचा कार्यक्रम होतो व दुपारी सद्गुरू श्रीसंत शिवदिननाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत नरहरिनाथ महाराज संस्थानचे वतीने हरिभक्तीपरायण वेदविभूषण श्री उद्बोधमहाराज यांचे पुण्यतिथीचे कीर्तन होते.


सायंकाळी नाथसंप्रदायाचे आराध्य भगवान श्रीआदिनाथांच्या मुर्तीची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा होते व रात्रौ १२ वाजता समाधीस रुद्राभिषेक होऊन महाआरती होते. दुसऱ्या दिवशी अर्थात अमावास्येला सकाळी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होऊन परंपरेच्या सर्व सेवक, मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात येतो व या मुख्य महोत्सवाची सांगता होते.खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांसह महाराष्ट्राच्या बाहेरून ही अनेक राज्यातून व परदेशातून भाविक या महोत्सवात सहभागी होऊन गुरुकृपेच्या अपरिमित लाभाची प्राप्ती करून घेतात.

nath-divider-icon-img